मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. निवडणूक लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पालिका यंत्रणेला तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तरी याबाबत राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक अयोगाशी चर्चा करून जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.


पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक अपेक्षित आहे. कोरोनाची रुग्ण संख्या कमी असल्यास महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगाने देखील निवडणूक तयारीसाठी महापालिकेला काम करायला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी यांची ऑनलाईन बैठक काल पार पडली.


यावरून राजकारण मात्र सुरू झाले आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यात राज्यात आता महाविकास आघाडी सरकार असून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. 2019 विधान सभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे.


गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला होता. आता या निवडणुकीत भाजप शिवसेनेविरोधात पूर्ण ताकद लावण्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तर राष्ट्रवादीची विशेष ताकद मुंबईत नाही. मनसे, समाजवादी, राष्ट्रवादी यांनासुद्धा मुंबई महापालिका हे ही या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.


राज्यात आधीच कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर, मीरा- भाईंदर, विरार या महापालिका निवडणुका कोरोनामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये दहा महापालिका निवडणुका त्यात ही मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे जाणार ही चर्चा सुरू होती. या निवडणुकीत लॉटरीद्वारे आरक्षण काढण्यात येणार आहे. तर वार्ड रचनेत बदल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात नवीन मतदार याद्या बनवण्याचे कामही महत्वाचे आहे. त्यामुळे निवडणूक वेळेवर घेण्याची पालिकेची तयारी आहे. आता राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.