मुंबई : कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर शिथिलता आणण्यात आली. कोरोना रुग्णसंख्येचा आलेख राज्यासह मुंबईतही उतरणीला लागल्याचं लक्षात येताच मायानगरीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले. याचे थेट पडसाद मुंबईत नियमांमध्ये शिथिलता येण्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आहे. 


शहरात येणाऱ्या वाशी, दहिसर, मुलुंड या मुख्य प्रवेशांच्या ठिकाणी वाहनांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. त्याप्रमाणेच बाजारपेठांमध्येही दुकानं सुरु झाल्यामुळं अनेक मुंबईकरांनी या ठिकाणचीही वाट धरली. नियमांमध्ये शिथिलता मिळालेली असली तरीही कोरोना संपलेला नाही, ही बाब मात्र मुंबईकर सपशेल विसरुन गेल्याचं चित्र दिसून आलं. त्याचमुळे मुंबईकर अशीच गर्दी करत राहिले तर कठोर निर्णय़ घ्यावा लागेल असा थेट इशारा शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. 


काय म्हणाल्या महापौर? 
नागरिकांनी आजही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याचं नागरिकांनी पालन करावं. या परिस्थितीमध्ये नागरिकांचं सहकार्य मिळणं अपेक्षित असून, तसं होत नसल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल. सध्याची कोरोना परिस्थिती आणि त्यासंदर्भात खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्य शासन आढावा घेत आहेत त्यामुळे निश्चितच यावर मार्ग काढण्यात येईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 


Lockdown Relaxation in Mumbai : मुंबईत निर्बंध शिथील; दुकाने खुली करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला


मुंबईत अत्यावश्यक दुकानांसोबतच बिगर अत्यावश्यक सेवांच्या दुकानांनाही मुभा 
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील.