मुंबई : राज्यात जनावरांना लम्पी आजाराची (Lumpy Skin Disease )लागण होत असल्याने पालिकेनेही (Brihanmumbai Municipal Corporation)  खबरदारी म्हणून मुंबईभरातील सर्वच गोशाळा, तबेले, गोठ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जनावरांमध्ये लक्षणांची तपासणी करण्यात येणार असून अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे. 


मुंबईसह (Mumbai)  राज्यात कोरोना (Corona) रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली असताना गोवंशीय जनावरांमध्ये लागण वाढलेल्या 'लम्पी' आजाराने भीती निर्माण केली आहे.  जळगाव जिह्यातील रावेर तालुक्यात ऑगस्टमध्ये जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे सर्वप्रथम समोर आले.  लम्पीच्या प्रसारात तब्बल 185 जनावरांना लागण झाली. यामध्ये 29 जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला.त्यामुळे मुंबई महापालिकेनंही  आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.  यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच पशुपालकांनी स्वच्छतेबाबत विशेष खबरदारी घ्यावी असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


लम्पी आजाराची लक्षणे



  • लम्पी आजार गोवंशीय प्राण्यांमध्ये होणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराला कॅपरी पॉक्सही म्हटले जाते. 

  • या आजारात डास, माश्या, गोचीड आदींच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होतो.

  • दूषित अन्नपाण्याच्या सेवनानेही आजाराचा प्रसार होतो. या विषाणूची लागण झालेल्या जनावरांच्या त्वचेवर गुठळ्या तयार होऊन फोड येतात.

  • यानंतर गुरांना ताप येणे, नाक वाहणे, जास्त लाळ गळणे, डोळे येणे अशी लक्षणे दिसतात. 

  • सध्या या आजारावर कोणताही उपचार नसून प्रतिबंधासाठी 'गोटपॉक्स' लस वापरली जात आहे.


महाराष्ट्रात 850 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव


 लम्पी स्कीनचा वाढता धोका लक्षात घेता सरसकट जनावरांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळं प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.


संबंधित बातम्या :


Lumpy Skin Disease : ठाणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जनावरं पॉझिटिव्ह


Lumpy Skin Disease : राज्यातील 19 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, जनावरांचे बाजार आणि जत्रा बंद, लसीकरणाच्या सूचना