Lumpy Skin Disease : सध्या राज्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहेत. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून खबरदारीची पावलं उचलण्यात येत आहेत. राज्यातील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच राज्यात आणि परराज्यात जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. तर पुढील आदेश येईपर्यंत जनावरांचे बाजार आणि जत्रा बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.


महाराष्ट्रात 850 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव


दरम्यान, लम्पी स्कीनचा वाढता धोका लक्षात घेता सरसकट जनावरांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळं प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यानंतर महाराष्ट्रातही या आजाराचा  पादूर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात 850 जनावरांना लम्पी स्कीन आजारानं ग्रासले आहे. त्यापैकी आतापर्यंत 590 जनावरे बरी झाली असून, उर्वरित जनावरांवर उपचार सुरु आहेत. तर संपूर्ण राज्यात आतापर्यंत 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 67 जनावरांना हा आजार झाला असून, पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.


अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात लम्पी स्कीन आजराची जनावरे आढळून आळी आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळं वेळीच या आजाराला रोखण्यात प्रशासनाला यश येत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. 


लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?


या आजारात जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते
लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो 
जनावरे चारा खाणे, पाणी पिणे कमी होते
हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात
डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते
पायावर तसेच कानामागे सूज येते
जनावरे दूध कमी देतात


पशुपालकांनी काय काळजी घ्यावी?


लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे
जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी 
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे 
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये 
लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे
बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी 
बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी
मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी


लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी स्कीन आजार हा कीटकांपासून पसरतो. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असल्याची माहिती  पशु परिवेक्षक डॉ. नितीन गाडीलकर यांनी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या: