मुंबई : महापालिकेचे आठ हजार कर्मचारी अजूनही निवडणूक ड्युटीवर असल्याने पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा प्रचंड खोळंबा होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई आणि मुंबई उपनगरच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. जर कार्यमुक्त करूनसुद्धा 13 जूनपासून मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी कामावर न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यभरातील विविध ठिकाणाहून विविध विभागातून कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी लावण्यात आले. मात्र आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा अनेक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून कार्यमुक्त न केल्याने मुंबई महापालिकेच्या पावसाळापूर्व कामे खोळंबल्याचं चित्र आहे. यामुळे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा प्रकारची विनंती केली आहे.
कामावर हजर न झाल्यास कारवाई होणार
मुंबई महापालिकेतील साधारणपणे 10,400 कर्मचारी अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेकडून पाठवण्यात आले होते. त्यातील 8000 कर्मचारी अजूनही मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत झालेले नाहीत. 6 जून रोजी यासंबंधी पत्र महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते.
निवडणुकीनंतरसुद्धा अधिकारी, कर्मचारी हे कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे अजून एक स्मरणपत्र जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेकडून पाठवण्यात आले. त्यामुळे 13 जूनपासून संबंधित महापालिका अधिकारी, कर्मचारी निवडणूक कार्यातून मुक्त होऊन महापालिकेच्या कामावर रुजू न झाल्यास त्याचे वेतन रोखण्यात येईल, शिवाय त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना महापालिकेकडून देण्यात आले आहे.
शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी काही कर्मचाऱ्यांची गरज
आता यावर आम्ही मुंबईतील जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुंबई महापालिकेतील काही कर्मचारी, अधिकारी हे 26 जून रोजी मुंबईत होणाऱ्या मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यासाठी आवश्यक असून काही कर्मचारी, अधिकाऱ्यांना आम्ही कार्यमुक्त करू शकलो नसल्याचं सांगितलं आहे. तर इतर सर्व अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिला असल्याचं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितलं.
मुंबईत पावसाळ्याला सुरुवात झालेली असताना निवडणुकीच्या कार्यासाठी काही कर्मचारी, अधिकारी सोडून इतर कर्मचारी अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केलेलं असताना अजूनही 8000 कर्मचारी जर कामावर रुजू होत नसतील तर नक्कीच महापालिकेच्या कामात अडथळा उद्भवू शकतो. त्यामुळेच प्रशासनाने कार्यमुक्त करूनसुद्धा जे कर्मचारी, अधिकारी पालिकेच्या कामावरून रुजू होत नाहीत अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे.
ही बातमी वाचा: