मुंबई : माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत महानगरपालिकेने (BMC) 17 मे रोजी पोलिसांत तक्रार केली. तर महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात 30 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. या अनधिकृत खोदकामातून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची महानगरपालिकेकडून गंभीर दखल घेण्यात आली असून महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व विभागातील सहायक आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.


महापालिकेकडून गंभीर दखल


पावसाळा सुरू झाल्याने स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदर पदपथाचे पुनर्भरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. त्यादरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणाची बृहन्मुंबई महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. आपापल्या विभागात अशा प्रकारे कुठे अनधिकृत खोदकाम केल्याचे आढळून आल्यास त्वरित पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना दिले आहेत. याच अनुषंगाने मुंबई महानगरातील इतर सर्व प्राधिकरणांनाही महानगरपालिकेने कळविले आहे.


दादर, माटुंगा परिसरातील एमटीएनएल ग्राहकांना सेवा देण्यासाठी एमटीएनएलने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील पदपथाखालून वाहिनी (केबल) टाकली आहे. एमटीएनएलकडे ग्राहकांच्या दूरध्वनी सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ लागल्या. 


या तक्रारीनंतर शोध घेतला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील बस थांब्याजवळ अज्ञातांनी पदपथ खोदून 103 मीटर लांबीची वाहिनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. या वाहिनीतील 6 लाख 78 हजार रुपयांचे तांबे अज्ञातांनी चोरून नेले आहे. याबाबत एमटीएनएलने माटुंगा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 


तथापि या प्रकरणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने तत्पूर्वीच म्हणजे 17 मे रोजी पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. महानगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी असे तक्रार अर्जात म्हटले आहे. तसेच 11 जून रोजी पुन्हा एकवार याप्रकरणी पोलिसांना पत्र पाठवून माटुंगा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व इतर आसपासच्या मार्गांवर रात्री पोलिस गस्त वाढवावी असे देखील या अर्जात महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी नमूद केले आहे.