मुंबईकर मतदारांनी कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यानं महापौर कोणत्या पक्षाचा होणार याबद्दल अजूनही संभ्रम आहे. पण, शिवसेनेनं 4 अपक्षांच्या पाठिंब्यासह एकूण 88 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. पण, अद्यापही सेनेच्या वतीनं महापौरपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळं महापौरपदाची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून महापौरपदाचे संभाव्य उमेदवार कोण?
आशिष चेंबूरकर:
नगरसेवकपदाची चौथी टर्म. तीन वेळा (हॅट्ट्रिक) बेस्ट समिती अध्यक्ष. विभागप्रमुख म्हणून समाधानकारक कामगिरी. 19 पैकी 13 जागा जिंकल्या.
वरळीचा शिवसेनेचा गड शाबूत ठेवला. बक्षीस म्हणून महापौर पद मिळण्याची शक्यता आहे. मध्य मुंबईतून सक्षम उमेदवार.
मंगेश सातमकर:
चौथ्यांदा नगरसेवक. पालिकेत स्थायी समिती आणि शिक्षण समितीत अनेक वर्ष काम पाहिलं आहे.
विभागप्रमुख म्हणून उत्तम संघटन कौशल्य आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव. महापौर पद नाही मिळालं तर स्थायी समिती अध्यक्ष पदाचा दावेदार.
सायन - चेंबूर या मध्य पूर्व परिसरातून संधी दिली तर सक्षम उमेदवार.
रमेश कोरगावकर:
नगरसेवकपदी चौथी टर्म. स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगर) आणि सलग सात वर्ष स्थायी समिती सदस्य.
भांडुप विधानसभा मतदारसंघातून अशोक पाटील यांना आमदारकी दिल्याने रमेश कोरगावकरांची संधी हुकली होती.
त्यांना यावेळेस महापौरपदी बसवून न्याय देण्याची शक्यता. महापौरपदासाठी पूर्व उपनगरातून सक्षम उमेदवार म्हणून चर्चा.
विश्वनाथ महाडेश्वर:
यंदा तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. पहिल्या टर्ममध्ये शिक्षण समितीचे चेअरमन, नंतर पाच वर्ष स्थायी समिती सदस्यपद सांभाळलं. २०१२ मध्ये पत्नी पूजा महाडेश्वर निवडून आल्या.
विश्वनाथ महाडेश्वर राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. वॉर्ड क्रमाक ८७ मधून भाजपचे महेश पारकर आणि काँग्रेसचे धर्मेश व्यास यांचा पराभव करून पुन्हा एकदा महापालिकेत शिवसेनेचा आवाज बनला. पश्चिम उपनगरातून सक्षम पर्याय.
महापौरपदासाठी खुलं आरक्षण असल्यामुळे, महिला नगरसेविकांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांचं नाव आघाडीवर असेल.
जुन्या महापौरना संधी मिळालीच तर खालील नावांची चर्चा आहे.
१) विशाखा राऊत
२) मिलिंद वैद्य
३) श्रद्धा जाधव