मुंबई : पावसाळ्यात पाणी साचून मुंबईची तुंबई होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पालिका पम्पिंग स्टेशन उभारत आहे. यापैकी माहुल पम्पिंग स्टेशनला लागणारी जागा मिळवण्याच्या बदल्यात आरक्षण बदलून बिल्डरला दिली जाणार आहे. यामधून बिल्डरला 1 हजार कोटी रूपयांचा फायदा होणार असल्याचा आरोप करत याला काँग्रेसचा विरोध असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. 


बिल्डरला जागा देण्यास काँग्रेसचा विरोध 
जरासा पाऊस पडला तरी हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केट, किंग सर्कल, सायन, चेंबूर या भागात पाणी जमा होते. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, चेंबूर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या साठी पालिकेला जागा मिळाली असून त्या बदल्यात वडाळा येथील आरक्षित जागेचे आरक्षण बदलून ती मोक्याची जागा बिल्डरला दिली जाणार आहे. याला काँग्रेसने विरोध केला आहे. या बाबत बोलताना माहूलचे पंपिंग स्टेशन होणे गरजेचे आहे. परंतु वडाळ्यातील मोक्याची 1300 चौरस मीटर जागा अजमेरा बिल्डरला देवून त्याला 1 हजार कोटी रूपयांचा फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडाळा येथील आरक्षित जागेचे आरक्षण बदलून ती जागा बिल्डरला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. बिल्डरला जागा देण्याऐवजी टीडीआर देण्यात यावा अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. 


माहुल पम्पिंग स्टेशनच मार्ग मोकळा  
प्रमुख अभियंता मलनिस्सारण विभाग हे मागील अनेक वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता प्रयत्नात आहे. केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा उपलब्ध करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला जात होता, मात्र याला यश आले नव्हते. अखेर खाजगी विकासकाकडून जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या जागेच्या बदल्यात टीडीआर किंवा अन्य ठिकाणी जागा देऊन माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनची गरज लक्षात घेता, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) यांनी मौजे आणिक न.भू.क्र. 1अ/11, 1अ/12 या दोन भूखंडांमधील 15500 चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात घेतली जाणार आहे. महानगरपालिकेच्या भूखंड न.भू.क्र.1अ/14 मधील 15500 जागा मे. अजमेरा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच पालिका आयुक्तांनीही याला मंजुरी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :