एकीकडे मुंबईत ठिकठीकाणी पाणी तुंबलेलं असताना तक्रार निवारण आणि संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवणाऱ्या आपातकालीन विभागाच्या कामावर इंटरनेट बंद झाल्यामुळे मोठा परिणाम झाला आहे.
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे सीएसएमटी परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना फटका बसला आहे.
मुंबईत केंद्र सरकारच्या एमटीएनएल या सरकारी कंपनीकडून फोन सुविधा पुरवली जाते. सरकारी कार्यालयांमध्ये आणि अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आजही एमटीएनएलचे फोन वापरले जातात.
तसेच सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे इंटरनेट वापरले जाते. मात्र आज पावसामुळे एमटीएनएलची फोन आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.
सीएसएमटी विभागात आज सकाळपासून एमटीएनएलची सेवा बंद आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील येणारे फोन बंद झाले आहेत. तसेच इंटरनेट सेवाही बंद असल्याने आज पालिकेच्या कार्यालयांमध्ये कामकाजावर परिणाम झाला आहे. अशीच परिस्थिती या परिसरातील इतर कार्यालयांचीही आहे.