मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज (08 जुलै) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं विलंबाने सुरु आहेत. पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.


मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी सात वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात एक घर कोसळून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
मुंबईत पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. परेल, वांद्रे कलानगर, अंधेरी सबवे, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, कांजुर मार्ग, असल्फा, साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ पावसामुळे पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऑफिसला जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विमानांची उड्डाणं विलंबाने
मुंबईच्या पावसाचा हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं 20 ते 25 मिनिटं विलंबाने सुरु आहे. तर तीन उड्डाणं वळवण्यात आली आहेत.

अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान, या आठवड्यात कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय विभागाने दिला आहे. तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पुढील 3 ते 4 तास असाच जोरदार पाऊस सुरु राहिल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.