मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडखोरीनंतर ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे. या निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट आणि भाजपाला (BJP) दिलेले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाची देखील दर्शन डिप्लोमसी सुरू आहे.
काय आहे शिंदेची दर्शन डिप्लोमसी?
गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या निमित्ताने दर्शन करत अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. शिंदे गणेशोत्सव काळात मुंबईत काही मंडळांच्यां तसेच शिवसेना नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करत दिवसेंदिवस संवाद वाढवत आहेत. या सगळ्या भेटीगाठींमध्ये विशेष लक्षणीय बाब ठरतेय ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करत बाप्पांचे दर्शन. येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे हे मुंबई दर्शन करत असल्याची देखील चर्चा.
मुख्यमंत्री होताच शिवसेनेच्या ज्येष्ठ फळीतील नेत्यांच्या भेटीगाठी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच शिवसेनेच्या ज्येष्ठ फळीतील नेते मनोहर जोशी, लीलाधर डाके , गजानन किर्तीकर यासारख्या नेत्यांचा भेटीगाठी घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. सत्तांतर झाल्यानंतर काही गोष्टींच्या अभवामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाणं पसंत केले. त्यामध्ये मुंबईतील पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा देखील मोठा समावेश होता. नुकतेच मुंबईत अनेक ठिकाणी गणेशोत्सवात शिंदे यांनी दर्शन घेत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेल्या अमेय घोले यांच्या गणपती बाप्पाचे देखील मध्यरात्री भेट देत दर्शन घेतले. त्यामुळे आगामी महापालिकेसाठी हे सर्व चालले आहे अशा चर्चांना उधाण आले आहे
आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तम संवाद , समन्वय आणि संपर्क साधत सर्वसामान्य ते प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत आहेत. त्यामुळे शिंदे यांना आगामी काळात दर्शन डिप्लोमसीचा किती फायदा होतोय हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपचं टार्गेट 150, कसा आहे 'मिशन मुंबई' मेगा प्लॅन?