Mumbai News : मढ मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून (Mumbai Mahanagar Palika) याप्रकरणी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती याप्रकरणाची चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली आहे. त्यांचा अहवाल 4 आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 


मढ मार्वे येथे तयार करण्यात आलेल्या 49 फिल्म स्टुडिओंच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसच्या (Congress) कोट्यातून कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. याप्रकरणी CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालाडच्या मढ, मार्वे, इरानगल आणि भाटी येथे 49 बेकायदेशीर स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला होता. बीएमसीनं चौकशीचे आदेश दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे सिद्ध होईल की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले असलम शेख (Aslam Shaikh) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे या घोटाळ्यात सहभागी होते. 


महापालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश


बीएमसी आयुक्त चहल यांनी जारी केलेल्या चौकशी आदेशात म्हटलं आहे की, "मालाड, मार्वे आणि लगतच्या भागात सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) सह 49 बेकायदेशीर स्टुडिओचे बांधकाम आणि एमडीझेड (सागरी संरक्षण क्षेत्र) चं उल्लंघन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. ज्यांना 2021-22 मध्ये नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. बनावट कागदपत्रं, खोट्या परवानगीच्या आधारे हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचं आरोपात म्हटले आहे.


आरोपांचं गांभीर्य आणि बेकायदा बांधकामाची तक्रार पाहता उपायुक्त हर्षद काळे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 4 आठवड्यांत अहवाल सादर करतील. त्याचबरोबर दोषींवर कारवाई करण्याची शिफारसही करणार आहेत. आयुक्त चहल यांनी सात मुद्द्यांवर तपास प्रक्रिया पुढे नेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बीएमसीचे अनेक अधिकारीही अडकण्याची भीती आहे.