मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी धुळ्यात बोलताना मुंबई महापालिकेसंदर्भात एक भाकित वर्तवले. मुंबईत शिवसेनेची सत्ता येणार असून, महापौर शिवसेनेचाच होईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार अशा चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. तसेच सुप्रिया सुळेंचे हे संकेत होते का? असाही प्रश्न सर्वांना पडला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे-भाजप या दोन पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरु आहे. तसेच इतर पक्षही आपल्यापरीने काम करत आहेत. अशातच आगामी मुंबई महापालिका निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढतील अशी चर्चा आहे. त्यात आता सुप्रिया सुळे यांनी केलेल्या भाकितानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना युती होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे
शिवसेना आणि राष्ट्रवादी कसे एकत्र येणार ?
मुंबई महापालिकेत एकूण 236 वॉर्ड आहेत. यामध्ये सत्तेत येण्यासाठी 114 जागांची गरज आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता येण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढण्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर शिवसेना 180 ते 190 जागांवर निवडणुका लढवणार तर राष्ट्रवादी 40 ते 50 जागांवर मुंबई महापालिकेत निवडणुक लढवेल. शिवसेनेचे सद्यस्थितीत असणारे 97 नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत. म्हणजे दोन्ही मिळून ही संख्या 105 आहे. तर आगामी महापालिका निवडणुकीत आणखी जोर लावून आपले काही नगरसेवक आणखी निवडून आणि इतर नगरसेवक आपल्या सोबत घेऊन महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता येऊ शकते. राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही, त्यामुळे मागच्या वेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर पडलेली मतं आणि सध्याची उमेदवारीची स्थिती याचा आढावा घेण्याचं काम सुरु आहे. अमराठी भाषिक वॉर्डांमध्ये राष्ट्रवादीला जागा देण्यावर शिवसेनेचा भर असेल. ज्या भागात भाजपची ताकद जास्त आहे त्या वॅार्डात दोन्ही पक्षाचा ताकदीने लढण्याचा विचार सुरु आहे. भाषिक रचनेने शिवसेना आणि राष्ट्रवादीत जास्तीत जास्त उमेदवारी ठरवली जाईल.
कोणत्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होणार ?
मुंबई महापालिकेत भाजपचं संख्याबळ कमी करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील. जसं राज्यात भाजपला दोन्ही पक्षांनी दूर ठेवलं तसंच मुंबईतही भाजपला डोकं वर काढू न देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यंदा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला कोणाच्या तरी मदतीशिवाय सत्ता स्थापन करणं अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढणार आहे. मुंबई महापालिका ही गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या हाती आहे. यामध्ये गेल्याच निवडणुकांमध्ये, ही महापालिका शिवसेनेच्या हातून जाता जाता वाचली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन लढण्यास मुस्लीमबहुल भागामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या काही भागात चांगला प्रभाव आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी जर एकत्र आली तर विविध विकासाच्या आणि राजकीय मुद्द्यांवर देखील स्थानिक पातळीवर भाजप तसेच इतर मित्रपक्षांना शह देता येईल, यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहे अशी माहिती मिळत आहे आणि ते शक्य आहे असा देखील राजकीय जाणकार सांगतात.
दोन्ही पक्षाचे मनोमिलन होण्याची चिन्हं?
मुंबई महापालिकेत सत्तेत येण्यासाठी बहुमताचा आकडा 114 आहे. आता शिवसेनेचे 97 नगरसेवक सद्यस्थितीला आहेत. तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर एकत्रित येऊन निवडणूक लढली तर बहुमताचा आकडा गाठणे शिवसेनेला सोपे पडणार आहे. तसेच राष्ट्रवादीला देखील महापालिकेत सत्तेत येण्याचा हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे दोघांचा मनोमिलन होण्याचा चिन्ह आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
अभासे – 1
एकूण – 227
बहुमताचा आकडा – 114
काँग्रेस स्वबळावर ?
राज्यात तीन पक्ष मिळून सत्तेत असले तरी नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून पक्षाने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, असं नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी याआधी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला वगळून युतीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असं बोललं जात आहे.
दोन्ही पक्षांची मते एकमेकांकडे वळणार की नाही ?
आगामी मुंबई आणि इतर महापालिका निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रिपणे लढल्यास दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का, यावर आता पक्षनेतृत्वाकडून अंदाज घेतला जात आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पारंपरिकदृष्ट्या एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्षही झाला आहे. त्यामुळे युती झाल्यास दोन्ही पक्षांची मते एकमेकांकडे वळणार की नाही, याबाबत विचारमंथन पक्ष नेत्यांमध्ये आता शेवटच्या टप्प्यात सुरु असल्याची माहिती मिळत आहे.