BMC commissioner Iqbal Singh Chahal : मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होऊ शकते. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान खड्डे पडण्याची शक्यता असते. या खड्ड्यांबाबत विविध माध्यमातून व हेल्पलाईनच्याही माध्यमातून माहिती व तक्रारी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास प्राप्त होत असतात. खड्डे विषयक तक्रारींवर 24 तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्कालीन व्यवस्थापन विषयक बैठकीत आयुक्तांनी (Iqbal Singh Chahal) दिले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी 48 तासांपेक्षा अधिक असू नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देशही, देण्यात आले आहेत.
गुरुवारी मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन विषयक बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विविध सूचना आणि निर्देश दिले आहेत. यामध्ये मुंबईत लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास पर्यायी बस व्यवस्थेचे आणि अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पावसाळ्यादरम्यान खड्डे भरताना प्राधान्याने ‘कोल्डमिक्स’ साहित्य वापरले जाते. तथापि, पावसाळ्यादरम्यान पाऊस नसण्याच्या दिवशी अन्य प्रकारचे साहित्य निर्धारित पद्धतीनुसार उपयोगात आणण्याचे निर्देश दिलेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमितपणे पाहणी करण्याचे व पाहणी दरम्यान आढळून आलेल्या खड्ड्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईत लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास पर्यायी बस व्यवस्थेचे नियोजन -
लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशाप्रसंगी प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहोचता यावे, यासाठी एसटी व बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश. या अनुषंगाने ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ (SOPs) बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर संभाव्य प्रसंगी नागरिकांच्या सुविधेसाठी 400 जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टची तयारी, तर 11 जादा बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्याची माहितीही देण्यात आली. लोकल ट्रेन बंद असण्याच्या परिस्थितीत प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार व इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने सुसमन्वय साधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांच्या स्तरावर आणि इतर संबंधित संस्थांच्या स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसारी समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली.
अति धोकादायक इमारतींबाबत
अति धोकादायक इमारतींमध्ये (C1 Building) राहणा-या रहिवाशांच्या जीविताची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश व त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मा. उप मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणा-या रहिवाशांनी सदर इमारत रिकामी करावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार आवश्यकती कार्यवाही व कारवाई देखील नियमितपणे करण्यात येत आहे. अति धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तात्पुरत्या निवा-यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत.