मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदा निवडणुकांचं वर्ष असल्याचं डोळ्यासमोर ठेऊन मुंबईकरांना खुष करण्याचा प्रयत्न होण्याची चिन्हं आहेत. गेल्या वर्षीच्या वास्तवदर्शी अर्थसंकल्पानंतर यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पात तब्बल 5 हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचं महापालिका बजेट 32 हजार 500 कोटींवर जाण्याचे संकेत आहेत.
गेल्या वर्षीच्या 27 हजार कोटींच्या बजेटमधील केवळ 37% रक्कमच खर्च करण्यात महापालिका प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडून बजेट खर्च करुन दाखवू म्हणणारं प्रशासन आता तोंडावर आपटलं आहे. त्यामुळे यंदा जरी बजेट पाच हजार कोटींनी वाढलं, तरी त्यातून मुंबईकरांना खरोखर हातात काय मिळणार हा प्रश्न आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर मुंबई.. एका छोट्या राज्याचं बजेट जितकं असेल, तेवढं बजेट या एका शहराचं आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणतात.
कसं असेल महापालिकेचं 2019-20 चं बजेट?
यंदा महापालिका अर्थसंकल्पात पाच हजार कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षातील वास्तवदर्शी अर्थसंकल्पानंतर पुन्हा यावर्षी अर्थसंकल्पाचा आकडा फुगणार
2018-19 च्या अर्थसंकल्पात 27 हजार 251 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची वाढ करुन अर्थसंकल्प 32 हजार 500 कोटींवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या 27 हजार कोटींच्या बजेटमधील केवळ 37 टक्के रक्कम खर्च
मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच केला जात नसल्याची टीका दरवर्षी नगरसेवकांकडून केली जात होती. त्यावर गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील सर्व निधी खर्च केला जाईल, अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र 37 टक्केच रक्कम खर्च करण्यास पालिका प्रशासनाला यश आलं आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 37 हजार कोटी रुपयांपर्यंत गेला होता. त्यावेळी एकूण अर्थसंकल्पापैकी 20 ते 25 टक्के इतकीच रक्कम खर्च करण्यास प्रशासनाला यश येत होते. याकारणाने अर्थसंकल्प फुगवला असल्याचे कारण देत पालिका आयुक्तांनी वास्तविक आकडेवारीवर आधारित 2017-18 वर्षासाठी 25 हजार 141 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात भांडवली खर्चासाठी 8 हजार 121 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी दोन हजार 518 कोटी रुपये म्हणजेच 31 टक्के खर्च करण्यास प्रशासनाला शक्य झाले.
जेवढे काम तेवढेच पैसे, असे धोरण प्रशासनाने ठरवले. मात्र अनेक विभागात तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अर्धीच रक्कम खर्च झाली आहे.
गेल्या वर्षातील बजेट किती खर्च झाले?
2018- 2019 मध्ये मलनिःसारण प्रकल्पासाठी 548.67 कोटींची तरतूद केली होती. मात्र या निधीपैकी अर्ध्याहून अधिक निधी खर्चच झाला नाही.
2019-20 मलनिःसारण प्रकल्पासाठी 100 कोटींची अधिकची म्हणजे 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
सार्वजनिक कामे आणि भांडवली खर्चासाठी 9 हजार 543 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 508 कोटी रुपये इतकाच खर्च करण्यास प्रशासनाला यश आले आहे.
खर्च निधीची टक्केवारी
रस्ते विभाग
2017- 2018 - 62.5 %
2018- 2019 - 51.4 %
मलनिःसारण
2017- 2018 - 70.9%
2018- 2019 - 89.4%
पूल विभाग
2017- 2018 - 57.2%
2018- 2019 - 39.8%
घनकचरा विभाग
2017- 2018 - 19.1%
2018- 2019 - 22.8 %
आरोग्य विभाग
2017- 2018 - 41.64 %
2018- 2019 - 34.65 %
गार्डन विभाग
2017- 2018 - 37.54%
2018- 2019 - 16.81 %
दरवर्षी अर्थसंकल्पातल्या तरतूद केलेल्या रकमेपैकी बरीचशी रक्कम शिल्लक राहत असली, तरी यंदा पुन्हा महापालिकेचा कल हा फुगीर अर्थसंकल्प सादर करण्याकडे राहील. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेचा वचननामा आणि आश्वासनांवर यंदा किती पैसे खर्च केले जातात ते बघणं महत्वाचं ठरेल.
यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी नवं काय?
शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पसाठी- कोस्टल रोडच्या कामासाठी 12 हजार कोटींची तरतूद केली होती. त्यात अजून तीन हजार कोटींची वाढीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे
विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर भर
सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांसाठी 1000-1200 कोटींची वाढीव तरतूद
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र या प्रकल्पांसाठी अधिक तरतूद असणार आहे.
जल बोगदा, रस्ते काम, पुलांची दुरुस्ती आणि नव्याने पूल बांधणे या कामांसाठी अर्थसंकल्पात अधिकच्या भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
तरतूद अशी असेल?
आरोग्य - 4500 कोटी
नागरी सुविधा - 9430 कोटी
शिक्षण - 2500 कोटी
पूल - 550 कोटी
रस्ते - 1200 कोटी
मलनिःसारण - 650 कोटी
यंदाचं एकूण बजेट (अंदाजे) - 32 हजार 500 कोटी रुपये
महापालिकेकडे विवीध बँकांमध्ये 75 हजार 538 कोटींच्या ठेवी आहेत. आंध्रा बँक, युनियन बँक, विजया बँक, आयसीआयसीआय बँक, युको बँक, इंडियन ओवरसीज बँक, युनियन बँक आँफ इंडिया अशा विविध बँकांमध्ये पालिकेच्या ठेवी असून विविध बँकांतून वर्षाला कोट्यवधी रुपयांचे व्याज या ठेवीवर पालिकेला मिळते
गेल्या काही वर्षातील बजेटचे आकडे
वर्ष - 2015 ते 2016
बजेट - 33514 कोटी
वर्ष - 2016 ते 2017
बजेट - 37052 कोटी
वर्ष - 2017 ते 2018
बजेट - 25141 कोटी
वर्ष 2018 आणि 2019
बजेट - 27258 कोटी
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा प्रभाव पालिकेच्या अर्थसंकल्पावर दिसेल, कोणतीही नवीन करवाढ होणार नाही. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असेल, यात शंका नाही
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, 5 हजार कोटींची वाढ होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 07:25 AM (IST)
मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच केला जात नसल्याची टीका दरवर्षी नगरसेवकांकडून केली जात होती. त्यावर गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील सर्व निधी खर्च केला जाईल, अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र 37 टक्केच रक्कम खर्च करण्यास पालिका प्रशासनाला यश आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -