मुंबई : दरवर्षी पावसाळा येतो तेव्हा सुखद सरींसोबतच दुःखद दुर्घटनांच्या बातम्यादेखील आणतो. पुण्यातील कोंढव्यातील दुर्घटना, मालाडमध्ये पडलेली भिंत, चिपळूणमध्ये फुटलेलं धरण यांसारख्या दुर्घटनांनी यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या काही दिवसांतच दुर्घटनांचं सत्र सुरु केलं आहे.

मुंबईत दर पावसाळ्यात एखादी जुनी इमारत, एखादी सुरक्षाभिंत कोसळते आणि त्याखाली अनेक जीव दबले जातात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी किंवा दरम्यान महापालिकेकडून काही धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते.

यंदा मुंबई महापालिकेने मुंबईतल्या तब्बल 499 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी जवळपास 390 इमारतींमधील रहिवाशांना पावसाळ्यात मोठा धोका आहे. धोकादायक इमारतींपैकी केवळ 68 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

धोकादायक इमारतींविषयी अधिक माहिती
मुंबईत अतिधोकादायक वर्गात मोडणाऱ्या 499 इमारती आहेत
अतिधोकादायक इमारतींपैकी एकही इमारत पूर्णत: पाडण्यात आलेली नाही.
54 धोकादायक इमारती रहिवाशांनी कोणतीही हरकत न घेता रिकाम्या केल्या आहेत.
14 इमारती रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. परंतु या इमारती तोडण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही.
174 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे.
65 इमारतींचे पाणी आणि वीज महापालिकेने कापली आहे. तरीदेखील लोक तिथे राहत आहेत.

...म्हणून इमारत धोकादायक असली तरी, रहिवाशी इमारत रिकामी करत नाहीत
न्यायाप्रविष्ट प्रकरणे, जुन्या इमारतींचे वाद, विकासकांकडून केली जाणारी अडवणूक, फसवणूक आणि ट्रान्झिस्ट कॅम्पचा सामान्यांनी घेतलेला धसका या कारणांमुळे इमारत कितीही जर्जर झालेली असली तरी अनेक रहिवासी जागा सोडून जात नाहीत. त्यातच, मुंबईत मोक्याच्या जागांना सोन्याचा भाव आहे. मोक्याच्या ठिकाणची जागा सोडली तर पुन्हा त्या जागी घर घेणे परवडणारे नाही, त्यामुळे रहिवासी राहती जागा सोडण्यास तयार होत नाहीत.