मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत धडक कार्यवाही मोहीम हाती घेण्यात आली असून गोवंडी (पश्चिम) येथे केना मार्केटबाहेर धडक मोहिमेअंतर्गत सुमारे चार हजार किलोहून अधिक मांस जप्त करण्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली आहे. या कार्यवाहीदरम्यान अतिक्रमण निष्कासन कार्यवाही करतानाच दंडात्मक कार्यवाहीदेखील करण्यात आली आहे. तसेच अनधिकृतपणे व्यवसायात वापरण्यात येणारी साधन सामुग्रीही जप्त करण्यात आले आहे. 


बाजार विभागामार्फत धडक कार्यवाही करत लागोपाठ दोन दिवस धडक मोहीम राबवतानाच 4 हजार किलोंहून अधिक मांस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 410 (1) अन्वये जनावरांच्या अनधिकृत आयातीवर, कत्तलीवर आणि अनधिकृत मांस, अनधिकृत कोंबडी व अनधिकृत मासळी विक्रेत्यांवर कार्यवाही नियमितपणे करण्यात येते. याच अंतर्गत गोवंडी पश्चिम परिसरात नुकत्याच झालेल्या धडक कारवाईत सुमारे 2 हजार 800 किलो बकऱ्यांचे मांस जप्त करण्यात आले. 


कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीसह, एम पूर्व विभागाच्या अनुज्ञापन खात्याचे कर्मचारी आणि सहाय्यक अभियंता (परिरक्षण) उपस्थित होते. नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाईत शेळ्यामेढ्यांचे 1 हजार 460 किलो मांस जप्त करण्यात आले. 


तसेच प्रचलित पद्धतीनुसार या मांसाची देवनार क्षेपणभूमी येथे विल्हेवाट लावण्यात आली. ‘एम पूर्व’ विभागाच्या अनुज्ञापन खात्यामार्फत सहा दुकांनांच्या ठिकाणी झालेल्या कार्यवाहीत 6 डिप फ्रिज, 21 एलपीजी सिलेंडर, 9 भांडी आणि इतर सामान जप्त करण्यात आले. ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या नेतृत्वात रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासन कार्यवाही करण्यात आली. तसेच देवनार पोलीस ठाणे येथे तीन व्यक्तींविरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.


ही बातमी वाचा :