मुंबई : मुंबईकरानो सावधान... तुम्हाला जर तात्काळ रक्ताची गरज भासली तर ते मिळेलच याची शक्यता कमी आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे.


'रक्तदान श्रेष्ठ दान' असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र गेल्या 5 महिन्यापासून मुंबईत रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता मुंबईवर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या 5 महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील 5 ते 6 दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.


BLOG | रक्तदान शिबिरांना कोरोनाचा खो!


मुंबईत कोरोनाचे संक्रमण होण्या पूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरं दर महिन्याला मुंबईत आयोजित होत होती. मात्र कोरोनामध्ये हजार ते बाराशे शिबीरं झाली आहेत. या कालावधीत 50 टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी 50 टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर 15 टक्के कॉलेज व 35 टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र कोरोनामुळे 5 महिन्यात ते मिळाले नाही.


2020 मधील रक्तसाठा


जानेवारी - 168144 युनिट
फेब्रुवारी - 145289 युनिट
मार्च - 110437 युनिट
एप्रिल - 53630 युनिट
मे - 91137 युनिट
जून - 99658 युनिट
जुलै - 60750 युनिट
ऑगस्ट - 62001 युनिट
सप्टेंबर - 63888 युनिट


मुंबईत 17 सरकारी रक्त पेढ्या आहेत. तर 10 खाजगी रक्त पेढ्या आहेत. आपल्या शहराच्या अथवा जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या 1 टक्का रक्त उपलब्ध असणे आवश्यक असते. मुंबईत कोरोना पूर्वी 1 हजार रक्ताच्या बाटल्या दिवसाला लागत होत्या. कोरोनामध्ये महत्वाची ऑपरेशन न झाल्याने रक्ताची मागणी या कालावधीत कमी झाली होती. एकदा रक्तदान केले की ते रक्त 35 दिवसच चालते. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे सध्या संकलन कमी झाले होते. कोरोनामुळे शिबिरासाठी सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते पुढं न आल्याने रक्तसाठा कमी झाला आहे. सध्या 5 ते 6 दिवस पुरेल इतका रक्तसाठा मुंबईत उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सामाजिक संस्था आणि नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी केले आहे. नवरात्रोत्सवामध्ये आरोग्य शिबिरं भरवून रक्तसाठा पुन्हा सुस्थितीत करण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो आता रक्तदान करणे ही आपली जबाबदारी आहे. असे म्हणून पुन्हा एकदा रक्तदान शिबिराला सुरुवात करा.