मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. परवा म्हणजे 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ल संकुलात भाजपने महामेळावा आयोजित केला आहे.
शिवसेनेने दसरा मेळाव्यात 'एकला चलो रे'चा नारा दिला, तर मनसेने गुढीपाडव्याला 'मोदी मुक्त भारताचं' आवाहन केलं. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपने सुद्धा यंदा कंबर कसली आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्यात महामेळाव्याचं आयोजन केलं आहे.
6 एप्रिलला राज्यासह देशभरातून सुमारे 4 लाख कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. याशिवाय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यासाठी जातीने लक्ष घातलं आहे.
महामेळाव्याच्या तयारीचा आढावा
- राज्यात 80 हजार बूथ प्रमुख
- 19 विंग, 7 आघाड्यांचे पदाधिकारी
- 5 हजार सरपंच, 12 जिल्हा परिषदा, 13 महापालिका आणि 72 नगरपालिकांचे लोकप्रतिनिधी
- आमदार-खासदार, जिल्हा-तालुका अध्यक्ष यांच्यावर प्रत्येकी 5 ते 10 कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी
- यासाठी महाराष्ट्रासोबत, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडूतून 28 विशेष ट्रेन येणार
- याशिवाय राज्यभरातून 300 बस आणि जिप
- या सभेसाठी बिकेसी मैदानात 3 मंच, 7 मंडप, 5 पार्किंग लॉट, 2 राहण्यासाठी तंबू
- कार्यकर्त्यांसाठी प्रवास सुरु झाल्यापासून ते पुन्हा घरी पोहोचेपर्यंत फूड पॅकेट्स आणि पाण्याची व्यवस्था
2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर महापालिका निवडणुकांपासून ते अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत भाजपने जिंकण्याचा रतीबच लावला. या चढत्या आलेखामुळे सत्तेची नशा डोक्यात गेल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते-पदाधिकऱ्यांमध्ये नव्याने जोश भरण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या निमित्ताने होताना दिसत आहे.
या जल्लोष सभेनंतर अमित शाह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स ऑडिट करणार आहेत. कार्यकर्त्यांना ऊर्जा दिल्यानंतर नेत्यांची झाडाझडती होणार आहे. मात्र प्रत्येक निवडणूक जिंकण्याचं तंत्र अवगत केलेल्या अमित शाह यांना महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचा कानोसा घेण्यात यश मिळतं का हे येणारा काळच ठरवेल.
6 एप्रिलला भाजपचा महामेळावा, मुंबईत शक्तीप्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Apr 2018 10:29 AM (IST)
शिवसेनेने दसरा मेळाव्यात 'एकला चलो रे'चा नारा दिला, तर मनसेने पाडव्याला 'मोदी मुक्त भारताचं' आवाहन केलं. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजपने सुद्धा यंदा कंबर कसली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -