मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत ओबीसींनी भाजपला साथ दिली आणि भाजपला चांगले यश मिळाले. यूपीमध्ये 65 टक्क्यांहून अधिक ओबीसी मतदारांनी भाजपच्या पारड्यात मते टाकली असं सांगितलं जात आहे. त्यामुळे यूपीमध्ये भाजपचा विजय सोपा झाला. आता उत्तर प्रदेशातील हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार ओबीसी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो.


यूपीमधील ओबीसीचा पॅटर्न काय होता?


- उत्तर प्रदेशमधील निवडणुकीपूर्वी भाजपने छोट्या-छोट्या ओबीसी जातींची संमेलन केली


- कुंभार, राजभर, न्हावी, निषाद, लोधी, पाल, तेली यासारख्या जातीतील कार्यकर्त्यांना बळ दिलं


- ओबीसी जातीतील लोकांच्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारने माती कला बोर्ड, केश कला बोर्ड, विश्वकर्मा बोर्ड या सारख्या संस्थांची स्थापना केली.


- ओबीसींसाठी राज्यात विविध योजना राबवल्या


- उत्तर प्रदेश निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना याचा फायदा झाल्याचे दिसते.


येत्या सहा महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यानिमित्ताने मिनी विधानसभेचा आखाडा महाराष्ट्रात रंगणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातही ओबीसीबाबत यूपीत राबवलेला पॅटर्न लागू करण्याची तयारी सुरु केली जात आहे. याच संदर्भात भाजपचं सध्या ओबीसी जोडो अभियान सुरु आहे. तर मे महिन्याच्या मध्यावधीत मुंबईमध्ये ओबीसींचा भव्य मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. या मेळाव्यात छोट्या छोट्या जातींना प्रतिनिधित्त्व देण्यात येणार आहे.


महाराष्ट्र भाजपकडे पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांची फौज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपने राज्यभर ओबीसींचे मोर्चे ही काढले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त ओबीसी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही प्रमाणात त्याला यश आलं. महाराष्ट्रात काय होतं? ते पाहणे महत्त्वाचे आहे.