मुंबईसिद्धिविनायक मंदिर न्यास (Siddhivinayak Temple Trust) अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप आमदार नितेश राणे यांनी सरवणकर यांचे अभिनंदन केले असून मावळते अध्यक्ष  आदेश बांदेकर यांच्यावर टीका केली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून आता मातोश्रीचा घरगडी गेला असल्याची बोचरी टीका राणे यांनी बांदेकरांवर केली. 


शिवसेनेचे (शिंदे गट) माहिम दादर विधानसभेचे आमदार (MLA Sada Sarvankar) यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. त्यासाठी गेल्या गणेशोत्सवात शिवसेनेच्या दोन गटांतील राडा कारणीभूत ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. सरवणकरांना सिद्धिविनायक पावला असून सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सरवणकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोलंल जात होतं. अनेक दिवसांपासून तर्कवितर्कही लावले जात होते. अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.


भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत बांदेकरांवर टीका केली, नितेश राणे यांनी म्हटले की, सदा सरवणकरांचं अभिनंदन! सिद्धिविनायक बप्पाची खरी सेवा तुमच्या हातातून आता होईल हा विश्वास आहे. नाहीतर या अगोदर सिद्धिविनायक बाप्पाचा कमी आणि “मातोश्री”ची जास्त सेवा करणारा अध्यक्ष बसवला होता. सामान्य लोकाना दर्शन बंद आणि 'मातोश्री'च्या लोकांना पाहिजे तेव्हा दर्शन दिले. 'वर्षा'वर गणपतीसाठी सिद्धिविनायकचे पुजारी जबरदस्ती आणायचे, यादी मोठी आहे. घरगडी गेला, अशी बोचरी टीका राणे यांनी केली. 







आदित्य ठाकरेंची सरवणकर यांच्या निवडीवर टीका


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर टीका केली. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, पण तसे न करता त्याला बक्षीस देण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा (Aadesh Bandekar) कार्यकाल संपल्यानंतर त्या ठिकाणी आमदार सदा सरवणकरांची नियुक्ती करण्यात आली आहे.  


गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. आता त्यांची सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली.