मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी भाजप आमदार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर हायकोर्टानं राज्य सरकारसह इतर प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे.  


'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे', असं वक्तव्य शिरूर येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातील महिलांनीही आपला निषेध नोंदवला होता. तसेच दरेकर यांना केलेल्या वक्तव्याबाबत सर्व महिलांची जाहीर माफी मागण्यासही सांगितलं होतं. दरेकरांनी अद्याप कोणतीही माफी मागितलेली नाही. 


सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब


दरेकरांनी महिलांचा अनादर करत बेताल वक्तव्य केलं असून या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, पोलीसांनी प्रवीण दरेकर यांच्यावर सीआरपीसी 482 आणि आयपीसी 509 या कलामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हाच गुन्हा रद्द करण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकार आणि तक्रारदार रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावत सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha