Shiv jayanti 2021 : दरवर्षी 19 फेब्रुवारीला देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर (Shivjayanti 2021) कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट असणार आहे. मागील काही दिवसांत कोरोनाची दहशत काहीशी कमी झाली होती, याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं. किंबहुना अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे, काही ठिकाणी नाटक- व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. पण, बुधवारी राज्यात काल पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.


दरम्यान, शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे. राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल राम कदमांनी पत्रातून केला आहे.


त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला मात्र राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. पण सरकार गप्प बसलं. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


राज्याच्या गृहविभागाने काढलेल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणं शिवजयंतीला  खालील नियम व अटी लागू असणार आहेत.


- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनामुळे यंदा साधेपणानं साजरी करावी.


- गड - किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच हा उत्सव साजरा करावा. अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरी किंवा अनेक गड- किल्ल्यावर जाऊन तारखेनुसार 18 तारखेला मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. पण, यंदा हे सारं टाळावं


- सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सदर कार्यक्रमांचं आयोजन ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करावी.


- प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी; महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक असेल.


- 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास मत्र परवानगी असेल. पण, तिथंही नियमांचं पालन बंधकारक असेल. आरोग्य विषयक कार्यक्रमांचं आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसोबतच मास्क, सॅनिटायझरचा वापरही करण्यात यावा.


- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनानं या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसं आवाहन करावं. या सूचनांशिवायही दरम्यानच्या काळात आणखी काही सूचना लागू झाल्यास त्यांचंही अनुपालन करावं.