मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Shiv Jayanti 2021 : शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करु, भाजपचा सरकारला इशारा


मार्गदर्शक सूचना


1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.


2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.


नियम व अटी लागू! छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर निर्बंध


3. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.


4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.


5. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,


6. Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.


शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा 


शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे. राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल राम कदमांनी पत्रातून केला आहे.