Bhagavad Gita School Syllabus : गुजरातमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23साठी सहावी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात महाकाव्य भगवद्गीता अनिवार्य कऱण्यात आली आहे. भारतीय संस्कृती आणि ज्ञान प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांमध्ये भगवद्गीतेतील मूल्ये आणि तत्त्वांची आवड निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं गुजरात सरकारने म्हटलं आहे. गुजरात सरकारने शाळेत भगवद्गीता अनिवार्य केल्यानंतर आता महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही यावरुन राजकारण सुरु झाले आहे. कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश म्हणाले की, ‘भगवद्गीता’चा शालेय अभ्यासक्रमात सहभाग करण्याआधी शैक्षणिक तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. मुंबईतही शाळेत भगवद्गीता शिकवण्यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये यापूर्वीच भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवावी अशी ठरावाची सूचना मांडली होती. मात्र, या ठरावाच्या सूचनेकडे शिवसेनेनं जाणिवपूर्वक दूर्लक्ष केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पालिकेवर आता प्रशासक नेमले गेले आहेत, त्यामुळे प्रशासकांनीच आता शाळेतील भगवद्गीता पठणाबाबतच्या ठराव सूचनेवर निर्णय घ्यावा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र, मुंबई महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी इतर 370 प्रस्ताव मांडले गेले मात्र, भाजपची भगवद्गीता पठणाची मागणी करणारी ठरावाची सूचना जाणिवपूर्वक वगळण्यात आली, असा आरोप भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी केला आहे.
दरम्यान, भगवद्गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा, अशी मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी संत साहित्याचे शिक्षण द्यावं, असंही भोसले म्हणाले आहेत. तसंच त्यांनी मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांना या बाबतीत राजकारण न करण्याचा सल्लाही दिला आहे.
गुजरातमध्ये नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत निर्णय
नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत काही मूलभूत तत्त्वे करण्यात आली आहेत. यापैकी एक तत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन आणि आधुनिक संस्कृती आणि ज्ञान प्रणाली तसेच परंपरांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृतीची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शिक्षण मंत्री जीतू वघानी म्हणाले, भगवद्गीतेचा परिचय भागांमध्ये केला जाईल. हा पवित्र ग्रंथ इयत्ता सहावी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि मजकुराच्या स्वरुपात सादर केला जाईल. तर इयत्ता नववी ते बारावीसाठी, ते प्रथम भाषेतील पाठ्यपुस्तकात कथा आणि मजकुराच्या स्वरुपात सादर केला जाईल. गुजरातमधील शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याच्या या नव्या कल्पनेबद्दल अधिक बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले, "भगवद्गीतेचा मजकूर प्रार्थना कार्यक्रमात समाविष्ट केला पाहिजे. अशी शक्यता आहे की पाठ्यपुस्तकांमध्ये एकतर सुधारणा केली जातील किंवा नवीन पुस्तकं सादर केली जातील, जी केवळ भगवद्गीतेपासून माहिती मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतील.