Sanjay Raut : शिवसेनेला एमआयएमने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा भाजपचा कट आहे. शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेला 'जनाब सेना' असे संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 


शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांना 'शिवसंपर्क अभियानांतर्गत' संवाद साधत मार्गदर्शन केले. शिवसेना भवनात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती देण्यासाठी माध्यमांशी संवाद साधला. 


संजय राऊत यांनी म्हटले की,  भाजपकडून एमआयएमला आघाडीच्या ऑफरची सूचना देण्यात आली. एमआयएमची ऑफर म्हणजे भाजपचा कट आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी गैरसमज पसरवण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.  शिवसेनेचे हिंदुत्व बदनाम करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही. शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 


शिवसेनेचे खासदार येत्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भात जनतेशी संपर्क साधणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. एका खासदारांच्या मदतीला 12 पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.  


भाजपने इतिहास विसरू नये


शिवसेनेला 'जनाब सेना' म्हणून संबोधणाऱ्या भाजपने आपला इतिहास विसरू नये असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणारी भाजप  आहे. मेहबूबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केले? हे फुटीरतावादी, दहशतवाद्यांसोबत असणार हा पक्ष आहे, असेही आम्ही भाजपला बजावले होते, असे यावेळी राऊत यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


CM Uddhav Thackeray : हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश