BJP Protest: अडचणीचे प्रश्न विचारणे हे बऱ्याच राजकीय पक्षांना रुचत नाही. नेत्यांच्या समर्थकांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधीतरी सामान्य नागरिकांनी उलट प्रश्न विचारणे गैरसोयीचे ठरते. असाच एक प्रकार आज दादरमध्ये (Dadar) घडला. हिंदू धर्मातील देवीदेवता आणि महापुरुषांबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांकडून माफीची मागणी करण्यासाठी भाजपकडून (BJP Protest) दादर रेल्वे स्थानकाबाहेर (Dadar Railway Station) आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यावेळी राज्यपालांना माफी मागण्यास सांगा असे सांगणाऱ्या सामान्य नागरिकाला दमदाटी करण्यात आली. ही दमदाटी भाजपच्या कार्यकर्त्याने (BJP Activist) केली. या घटनेची दादर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.
आज मुंबईत एकीकडे महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिंदू धर्मातील देवीदेवता आणि महापुरुषांबद्दल कथित वादग्रस्त केलेली वक्तव्यांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली. त्याचाच एक भाग म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात दादरमध्ये आंदोलन करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना एक सामान्य व्यक्ती हे आंदोलन पाहत होता. त्यावेळी त्याने अचानकपणे, तुमच्या राज्यपालांना आधी माफी मागायला सांगा, अशी मागणी केली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला आंदोलन स्थळापासून दूर नेले. यावेळी भाजप कार्यकर्त्याने त्या व्यक्तीला धमकी दिली. इथून निघून जा, नाहीतर तुझं तोंड फोडतो अशी धमकी त्याला दिली गेली. पोलिसांनी या नागरिकाला दूर नेले. काही वेळ इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ती व्यक्ती तिथून लांब होताच आंदोलन पुन्हा सुरू झाले. ही व्यक्ती निघून जात असताना भाजप कार्यकर्त्यांकडून त्याच्याविरोधात शेरेबाजी करण्यात येत होती.
भाजपकडून राज्यभरात आंदोलन
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या व्हिडिओतील वक्तव्यावरून भाजपने आज राज्यभरात 'माफी मांगो' आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे मंत्री, नेते सहभागी झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: