मुंबई : मुंबई महापालिकेनं मास्क न घालणाऱ्यांसोबतच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवरही मोठी कारवाई केलीय. कोरोना संकटकाळातल्या गेल्या सुमारे 6 महिन्यात 12 हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तब्बल रुपये 24 लाख 89 हजार 100 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. सर्वाधिक दंड वसूली कुर्ला भागातून झालीय.


सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. यानुसार कोरोना संकटकाळातल्या गेल्या सुमारे 6 महिन्यात 12 हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये 24 लाख 89 हजार 100 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी  उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.


सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 461 अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – 2006 ’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक ४.५ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तिंकडून रुपये 200 इतकी दंड वसुली करण्यात येते. 


यानुसार गेल्या सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीत रुपये 24 लाख 89 हजार 100 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून करण्यात आली असून, ती रुपये 3 लाख 52 हजार 600 इतकी आहे. या खालोखाल ‘ए’ विभागातून रुपये 3 लाख 29 हजार 800 , तर ‘सी’ विभागातून रुपये 2 लाख 34 हजार 800 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.


महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे आढळून आलेल्या व्यक्तिंकडून ‘प्रति व्यक्ती, प्रति घटना’ रुपये 200/- इतका दंड वसूल करण्यात येतो. यानुसार वसूल करण्यात आलेल्या विभागनिहाय दंड रकमेची माहिती पुढीलप्रमाणे आहेः-

·         ए विभाग - रुपये ३,२९,८००/-


·         बी विभाग - रुपये १,३१,०००/-


·         सी विभाग - रुपये २,३४,८००/-


·         डी विभाग - रुपये ६६,४००/-


·         ई विभाग - रुपये २०,०००/-


·         एफ दक्षिण विभाग - रुपये २,१७,४००/-  


·         एफ उत्तर विभाग - रुपये ५०,६००/-


·         जी दक्षिण विभाग - रुपये २६,०००/-


·         जी उत्तर विभाग - रुपये २५,९००/-


·         एच पूर्व विभाग - रुपये १,७१,४००/-


·         एच पश्चिम विभाग - रुपये २५,८००/-


·         के पूर्व विभाग - रुपये २७,०००/-


·         के पश्चिम विभाग - रुपये ९५,६००/-


·         पी दक्षिण विभाग - रुपये ६९,८००/-


·         पी उत्तर विभाग - रुपये १,७९,२००/-


·         आर दक्षिण विभाग - रुपये ३३,५००/-


·         आर मध्य विभाग - रुपये ४३,८००/-


·         आर उत्तर विभाग - रुपये ९४,८००/-


·         एल विभाग - रुपये ३,५२,६००/-


·         एम पूर्व विभाग - रुपये १९,२००/-


·         एम पश्चिम विभाग - रुपये १,०१,२००/-


·         एन विभाग - रुपये ७१,३००/-


·         एस विभाग - रुपये ९०,४००/-


·         टी विभाग - रुपये ११,६००/-