भिवंडी : तालुक्यातील दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशनच्या प्रवेशद्वारासमोर दोन मद्यधुंद पोलिसांनी वडील व मुलीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका स्थानिकानेदेखील दोघांना मारहाण केली आहे. शैलेश पाटील(पोलीस शिपाई) 2), जाधव (पोलीस)आणि दिनेश पाटील (स्थानिक)अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. दोन्ही पोलीस नारपोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोन्ही पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


गुंदवली येथील तरुणी आणि तिचे वडील नवी मुंबई येथून ग्रामसेवक भरती परिक्षा संपवून परतत होते. दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशन येथील प्रवेशद्वाराजवळ तरुणी तिच्या वडिलांची वाट पाहात उभी होती. तेव्हा त्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस मद्यधुंद अवस्थेत पोहोचले. पोलीस मुलीच्या जवळच लघुशंकेसाठी उभे राहिले. त्यावरुन तरुणीने पोलिसांना हटकले.

तरुणीने पोलिसांना लघुशंकेवरुन हटकल्यानंतर आम्ही पोलीस आहोत, आम्ही कोठेही काहीही करु शकतो, असे उत्तर देत पोलिसांनी तरुणीला शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी तरुणीला मारहाण केली, तिचे कपडेदेखील फाडले.

पोलीस तरुणीला मारहाण करत असताना तिचे वडील (शांताराम म्हात्रे) तिथे पोहोचले. यावर म्हात्रे यांनी पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी एका स्थानिकाच्या मदतीने तरुणीच्या वडीलांवरही हल्ला केला. या मारहाणीत ते जखमी झाले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलीस शिपाई शैलेश पाटील व त्याचा दोघा साथीदारांविरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यापैकी दोघांना अटक केली आहे. दरम्यान पीडित मुलीला गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचे पीडितेने सांगितले.