Bhiwandi News: देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या (Mumbai) अगदीच जवळ असलेलं एक गाव.  भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत (Bhiwandi Ganeshpuri Village) हद्दीतील पलाट पाडा (palat Pada) या गावात अत्यंत दुरवस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेले ही गांव समस्यांचे माहेरघर बनले आहे. समस्यांना कंटाळून या लोकांनी आमचा वेगळा देश निर्माण करावा अशी मागणी केली आहे. 


साध्या साध्या सुविधाही नाहीत


या गावात आतापर्यंत रास्ता झालेला नाही परिणामी लोकांना गावात ये जा करण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. या गावातील शेजारीच असलेल्या तलावातून पाईपलाईन टाकून सर्व पाणी ही वसई विरार महापालिकेतील लोकांना पुरविले जात आहे. मात्र याच आदिवासी बांधवांना साधी एक पाण्याची लाइन टाकून दिलेली नाही. या पाड्यात आजपर्यंत आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी किंवा डॉक्टर आलेला नाही. या पाड्यात आजपर्यंत वीज आलेली नाही, आताही ही लोक अंधारातच राहत आहेत. या पाड्यात 20 ते 22 लाहान बालकं आहेत मात्र इथे अंगणवाडी किंवा शाळा काहीही नाही. एखादा रुग्ण, गर्भवती महिला दवाखान्यात न्यायची तर झोळी किंवा होडीचा आधार या लोकांना घ्यावा लागतो.  वर्षानुवर्षे ही आदिवासी बांधव या गावात राहात आहेत, नियमितपणे मतदान करत आहेत मात्र यांच्या घरांना अजूनही घरपट्ट्या लावलेल्या नाहीत. 


अनेक समस्यांचा बाजार असेलेले ही आदिवासी गाव शासनांच्या योजनांपासून तर वंचित आहेच मात्र त्यांचे मूलभूत अधिकारही त्यांना मिळत नाही ही दुर्दैव आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी बांधवांच्या एका पाड्यावर ही अवस्था असणे खरंच लाजिरवाणे आहे. 


आदिवासींच्या पाड्यावर मुलभुत सुविधांचा वाणवा दुर्दैवी

याबाबत श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना प्रत्यक्ष  भेटून सांगितले  आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही आदिवासींच्या  या  पाड्यावर मुलभुत सुविधांचा वाणवा दुर्दैवी आहे. कांता चिंतामन बरफ या बोट चालवून मुलांना शाळेत सोडणाऱ्या तरुणीने आपली व्यथा सांगितली. रस्ता नसल्याने तिने अर्ध्यावर शाळा सोडली पण मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून ही तरुणी मुलांना बोटीत सोडते. आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती झाल्याने आम्हाला  आता तरी सुविधा मिळतील असे कांता म्हणते.