Deepak Kesarkar On Sanjay Raut :  शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरातून ईडीने (ED) जप्त केलेल्या रोख रक्कमेपैकी दहा लाख रुपयांची रक्कम ही एकनाथ शिंदे यांच्या नावावर असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या असताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना शिंदे यांच्या विरोधात अयोध्येत जाऊन काही कारवाई करायची असेल म्हणून ती रक्कम असावी असे केसरकर यांनी म्हटले. 


रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा मारला होता. यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. यावेळी ईडीने काही कागदपत्रे आणि साडे अकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यातील दहा लाख रुपयांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर उर्वरीत दीड लाख रुपये हे राऊत यांचेच असून घर खर्चासाठी आणले होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली. 


संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया नोंदवताना शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अयोध्येत काही करायचे असेल म्हणून ते पैसे काढले असावेत. ईडीला या पैशांचा स्रोत दाखवावा लागणार असून राऊत हा स्रोत दाखवतील असेही केसरकर यांनी म्हटले. महाराष्ट्रातील ईडीने केलेल्या 90 टक्के कारवाया या बिल्डरांविरोधात असून 10 टक्के कारवाया राजकीय नेत्यांविरोधात असल्याचे केसरकर यांनी म्हटले. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी सातत्याने चौकशीसाठी वेळ मागून घेतली. अशी वेळ मागणे चुकीची असते, यातून साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो असेही केसरकर यांनी म्हटले. 


शिंदे गटातील काही आमदार ईडीच्या रडारवर आहेत. याबाबत विचारले असता केसरकर यांनी सांगितले की, ईडीने चौकशी करणे म्हणजे कारवाई सुरू आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही केलेला उठाव हा शिवसेना वाचवण्यासाठी केला होता. त्याचा चौकशीचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमची लढाई शिवसेनेच्या अस्तित्वाची आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरून आमच्याकडे कोणी येऊ नये असेही केसरकर यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut Timeline : संजय राऊतांची 17 तास चौकशी, नंतर अटक! काल सकाळपासून मध्यरात्री अटकेपर्यंत नेमकं काय-काय घडलं?