भिवंडी : भिवंडीतील 25 वर्षीय तरुणाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या 12 तासात यश आलं आहे. विशेष म्हणजे आरोपीला पायाच्या बोटांवरुन ओळखून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.


भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात असलेल्या बहात्तर गाला भागातील एका कंपनीत रात्रीच्या सुमारास झालेल्या तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली होती. 25 वर्षीय कृष्णा गौतमची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन बारा तासांच्या आत हत्येचा उलगडा केला. 22 वर्षीय आरोपी राजकुमार राजेंद्र सिंगला अटक झाली आहे.

बहात्तर गालामधील एका खाजगी कंपनीत कृष्णा गौतम, त्याची सासू आणि आरोपी राजकुमार काम करत होते. मात्र कृष्णा आणि राजकुमार यांच्यात नेहमी भांडणं होत असत. आरोपी राजकुमार आणि आपल्या सासूचे अनैतिक संबंध असल्याचा कृष्णाला संशय होता.



रोजच्या भांडणाला कंटाळलेला राजकुमारने रात्री दोनच्या सुमारास कंपनीतच कृष्णाला गाठलं. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा  जोरदार भांडण झालं. मात्र राजकुमार पूर्ण तयारीत आला होता. त्याने आपल्याजवळील धारदार हत्याराने कृष्णाच्या डोक्यावर दोन ते तीन वार केले. यामध्ये कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.

परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे भोईवाडा पोलिसांनी तपास सुरु केला. एक बुरखाधारी युवक कृष्णाकडे जाताना दिसला. त्याच्या पायातील बोटांमध्ये जास्त फट असल्याने पोलिसांनी कंपनीतील कामगारांच्या पायातील बोटे तपासून पाहिली. त्याआधारे राजकुमारला पोलिसांनी अटक केली. आरोपीनेही आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला.