मुंबई : राष्ट्रवादीने माढ्याचा तिढा सोडवल्यानंतर आता भाजपही आपला उमेदवार जाहीर करण्याची चिन्हं आहेत. रोहन देशमुख यांना माढ्यातून भाजपचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहन हे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे जावई आहेत. जावयाच्या उमेदवारीच्या तडजोडीवर काकडेंचं बंड थंड झाल्याच्या चर्चा आहेत.

रोहन देशमुख हे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव, तर संजय काकडे यांचे जावई. रोहन देशमुख 'लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह'चे अध्यक्ष आहेत. माढ्यातून जेव्हा शरद पवार उमेदवार असणार होते, तेव्हा सुभाष देशमुख त्यांना टक्कर देण्याच्या तयारीत होते. मात्र राष्ट्रवादीतून संजय शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच रोहन देशमुखांना भाजपचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

नाराज असलेले पुण्याचे खासदार संजय काकडे यांचं मन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वळवलं आहे. त्यामुळे संजय काकडे यांची काँग्रेसवारी टळली आहे. जावयाला तिकीट देण्याच्या बोलीवरच काकडेंचं बंड शांत करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याचं म्हटलं जात आहे.

रोहन देशमुख माढ्यातून भाजपचे उमेदवार झाल्यास राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंशी त्यांची लढत होईल. शिंदे हे सध्या शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात.
खासदार संजय काकडेंची काँग्रेसवारी टळली, मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश

अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख हे संजय काकडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या शिष्टाईला यश आलं. भाजपमधील पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवून गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यामध्ये तह झाला. त्यामुळे संजय काकडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

संजय काकडे हे राज्यसभेचे खासदार आहेत. काकडे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अजित पवारांशी संजय काकडे यांचे मतभेद झाल्याने आणि राज्यसभा उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. यानंतर भाजपचे सहयोगी खासदार म्हणून त्यांची ओळख होती.

संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संजय काकडे काँग्रेस प्रवेशावर ठाम


70 टक्के पुणेकरांची मला पसंती, भाजपच घरी येऊन लोकसभेचं तिकीट देईल : संजय काकडे