मुंबई : अंध व्यक्तींना आणि विशेषत: मुलांना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी आता रिझर्व्ह बँकेकडून एका खास मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. आरबीआयच्यावतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती देण्यात आली.


याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीबाबत आरबीआयनं सहमती व्यक्त केली असून त्याबाबत चार सदस्यीय तज्ज्ञांची समितीही नेमण्यात आली आहे. या समितीने केलेल्या पाहणीनंतर अंध व्यक्तिंसाठी नोटा पडताळणीबाबत एखादे मशिन किंवा यंत्रणा असण्यापेक्षा मोबाईल अॅप जास्त सोयीस्कर ठरु शकेल, अशी शिफारस करण्यात आली.


आरबीआयनं ही शिफारस मान्य करत पुढची कार्यवाहीदेखील सुरु झालेली आहे, असं आरबीआयच्यावतीनं सांगण्यात आलं. मात्र या सूंपर्ण प्रक्रियेसाठी आणखी काही महिने जाऊ शकतात, असेही यावेळी न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं.


नवीन नोटा व नाणे स्पर्शाद्वारे ओळखणे कठीण जात असून या नोटा व नाण्यांमध्ये विशेष खुणा आणि चिन्हे समाविष्ट करावीत या मागणीसाठी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड (नॅब) या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.