भिवंडी : भिवंडी कोर्टात दोन वकिलांमध्ये युक्तिवाद सुरू असताना न्यायाधीशांसमोरच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ॲड. शैलेश गायकवाड आणि ॲड. अमोल कांबळे यांच्यात भिवंडी न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्याच दरम्यान या दोघांमध्ये एका विषयावरून वाद झाला आणि याच वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान अमोल कांबळे याने शैलेश गायकवाडच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच याबाबत वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांनी पोलीस ठाणे गाठलं. या दरम्यान ॲड शैलेश गायकवाड हा पोलीस ठाण्यात उभा होता. याप्रकरणी एबीपी माझाचे पत्रकार अनिल वर्मा यांनी पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान गायकवाड याने अनिल वर्मांना शिवीगाळ करत बातमी लावली तर तुला बघून घेईन असे धमकावत पोलिस ठाण्यासमोरच मारहाण करण्यास सुरुवात केली.


आम्ही दिलेल्या बातम्या लावत नाही. तुला बघतोच. तू आमची बातमी कशी लावतो अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या या प्रकरणात पत्रकार अनिल वर्मा यांच्याकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. परंतु पोलिस ठाण्यातच पोलिसांसमोर पत्रकारांना मारहाण होत असल्याने नागरिकांना कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न देखील यानिमित्तानं उभा राहिला आहे.