भिवंडी : भिवंडीमध्ये टोरेंट पॉवर विरोधात मनसे आक्रमक झाली होती. काही संतप्त कार्यकर्त्यांनी टोरेंटचे कार्यालय फोडले होते. याच कार्यकर्त्यांचा मनसेकडून सन्मान करण्यात आला आहे. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत भिवंडी शहरात आयोजित कार्यक्रमादरम्यान अविनाश जाधव यांनी मनसे कार्यकर्त्यांचा सपत्नीक सन्मान केला आहे.
लॉकडाऊन काळात नागरिकांना अवाजवी विद्युत बिल आकारण्यात आलंय आणि हेच बिल कमी करून किंवा माफ करण्यात यावं, अशी मागणी करत अंजुरफाटा आणि आमपाडा येथील टोरेंट पॉवरचे कार्यालय मनसैनिकांनी फोडले होते. याच दरम्यान भिवंडी पोलिसांनी 18 कार्यकर्त्यांना अटक केली होती. या कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानंतर भिवंडी शहरातील ब्राम्हणअळी येथे मनसेच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. इंग्रजांसारखा जुलूम टोरेंटकडून भिवंडीकरांवर केला जात आहे. आमदार व खासदार करतात तरी काय? अशा प्रश्न विचारत यापुढे टोरेंट मुक्त भिवंडीचा नारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
टोरेंट विरोधात मनसे आक्रमक
याआधी 7 जानेवारी रोजी वाढीव वीज बिलाविरोधात भिवंडीमध्ये मनसे आक्रमक झाली होती. मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोरेंट पॉवर ऑफिस कार्यालय गाठून तोडफोड केली होती. नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल तात्काळ कमी करण्यात यावे, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेविसेचे भिवंडी जिल्हाध्यक्ष संतोष साळवी यांनी दिला होता. वाढीव वीज बिलाबाबत वारंवार पाठपुरवठा करून देखील कोणताच तोडगा निघत नसल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खळखट्याक आंदोलन केलं होतं. दरम्यान या आंदोलनात अंजुर फाटा आणि आमपाडा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. या आंदोलनाची मनसेने जबाबदारी घेतली असून येत्या काळात नागरिकांना देण्यात आलेले वीज बिल कमी न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला होता.