मुंबई : विरोधी पक्षांकडून भाजपवर राफेल घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याप्रकरणी क्लीन चीट दिली असली तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल प्रकरणावरुन भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो)आज परळच्या कामगार मैदानाबाहेर आंदोलन केले.


या आंदोलनामुळे कामगार मैदानाजवळच असलेल्या काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. टिळक भवनाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी टिळक भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसच्या पोस्टरवरील राहुल गांधींच्या चेहऱ्याला काळे फासले.

परळसह भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेसमोर असलेल्या काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना त्याब्यात घेतले आणि थोड्या वेळावे सोडून दिले. भाजप नेते राज पुरोहित, सुनील राणे, मनोज कोटक या आंदोलनात सहभागी झाले होते.