मुंबई : राफेल घोटाळ्याप्रकरणी आज काँग्रेस कार्यालयावर भाजप मोर्चा काढणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. राफेल चोरांचे स्वागत, अशा आशयाचे पोस्टर काँग्रेसकडून लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील राफेल वॉर चव्हाट्यावर आला आहे.

राफेल विमान घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते दुपारी एल्फिस्टन रोड येथील कामगार मैदानावर एकत्र येणार आहेत. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मात्र त्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून बॅनरबाजी केली आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने भाजपला राफेल विमान खरेदी प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. मात्र काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला होता. तसेच चौकिदार ही चोर है असा पुनरुच्चार केला होता. त्यानंतर भाजपाने राफेल घोटाळ्याप्रकरणी देशभरात 70 पत्रकार परिषद घेतल्या होत्या.