मुंबई : माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावं लागेल, असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना शिक्षा द्या, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. योगेश शुक्लासारख्या अनेकांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतल्याचं सांगत या सर्वांना भारतरत्न द्याव लागेल, अशी भूमिका सावंत यांनी ट्वीटद्वारे मांडली आहे.

सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलंय. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय आहे ट्वीटमध्ये -
काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे 1909 ते 21 या कालावधीत 149, 1922 ते 31 काळात 30 व 32 ते 1938 काळात 386 लोक होते. यामध्ये योगेश शुक्लासारख्या अनेकांनी शिक्षा भोगून गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चळवळीत भाग घेतला. माफी न मागता अभिमानाने शिक्षा भोगणाऱ्या सर्वांना भारतरत्न द्यावे लागेल.

काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेल्या या सर्वांनी ब्रिटिशांना साथ दिली नाही. ब्रिटिशांकडून मानधनही घेतले नाही. सावरकर समर्थकांनी अंदमान जेल जाऊन नुसते पाहिले तर माफी न मागणाऱ्या व प्राणांची आहुती देणाऱ्या या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाचे महत्व कळेल. 1911 च्या आधीचे सावरकर वेगळे होते.

1923 नंतरच्या सावरकरांच्या विचारांना आमचा विरोध आहे. आंबेडकरांना माथेफिरू, बुध्दधर्मियांना राष्ट्रद्रोही, शिवरायांच्या सद्गुणांना विकृती म्हणणारे तसेच त्रावणकोर स्वतंत्र केल्याचे अभिनंदन करणारे सावरकर आम्हाला मान्य नाहीत. याउपरही सावरकरांना भारतरत्न देण्याकरिता भाजपाकडे बहुमत आहे, असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

राऊतांचे वैयक्तिक मत - आदित्य ठाकरे
आपल्या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे - काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत. मात्र, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावा ही शिवसेनेची भूमिका आहे. त्याचा राज्यसरकारशी काहीच संबंध नाही. सावरकरांबद्दलची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. सावकरांच्या विचाराने या देशाला विभाजित केल्याचा इतिहास देशाला माहिती असल्याचं अतुल लोंढे म्हणाले.

Vikram Gokhale | स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण असल्याने त्यांच्या विरुद्ध रान उठवलं जातंय : विक्रम गोखले | ABP Majha