मुंबई : नोकरी व्यवसाय आणि कामानिमित्ताने दररोज हजारो मुंबईकर दादर स्टेशनवरुन ये-जा करत असतात. यावेळी गडबडीत असणाऱ्या मुंबईकरांच्या कानावर पडतात ते सलीम शेखच्या बसरीतील मंजुळ स्वर. कितीही गडबड असली तरी आपले हात पाकिटामध्ये जाऊन त्यातले पाच, दहा रुपये मुंबईकर हळूच बाहेर काढतो आणि सलीमच्या खिशात ठेवून पुढे निघून जातो. सलीम मुंबईकरांना हवाहवासा वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे हा सलीम शेख?
दादर स्टेशनच्या रेल्वे ब्रिजवर दररोज सकाळी न चुकता सलीम शेख बासरी वाजवत उभा असतो. सलीम जन्मत: अंध आहे. अंध शाळेमध्ये कसंबसं त्याने आपले शिक्षण पूर्ण केल्यामुळे कुटुंबांनेही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळे आता आपलं कसं होणार या विचारात नेहमीच सलीम असायचा. शाळेत असतानाच सलीम अनेक वाद्य वाजवायचा, गाणंही गायचा, एकेदिवशी सलीमचे शिक्षक मजर शेख यांनी शाळेमध्ये बासरी आणल्या. बासरीची माहिती देत त्यांनी काही गाणीही बासरीवर वाजवली आणि सलीमला या बासरीने आपल्याकडे आकर्षित करुन घेतलं. तिथून सुरु झाला सलीमचा या बासरीसोबतचा प्रवास. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, की आपण नशिबाला दोष देत बसतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. पण सलीमचं जीवन तर जन्मापासूनच अंधारमय. अशा परिस्थितीतही सलीमने न घाबरता या अंधाराशी सामना करायला सुरुवात केली. शालेय शिक्षण संपल्यानंतर पुढे जगायचं कसं हा प्रश्न सलीम पुढे उभा राहिला होता. अशावेळी शिक्षकांनी शिकवलेली बासरी हातात घेऊन त्याने आपला प्रवास सुरु केला. दररोज सकाळी सलीम कल्याणहून दादरच्या दिशेने लोकलने येतो. दादरच्या रेल्वे ब्रिजवरुन सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांची गाणी तो बासरीवर वाजवतो. सलीमला आपण अंध असल्याची अजिबात खंत नाही. दररोज घरातून बाहेर पडत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच बाहेर पडतो. माझा आजचा दिवस इतरांप्रमाणेच चांगला जाणार हा विश्वास सलीम आपल्या मनाशी बाळगतो आणि तो मुंबईची वाट धरत असतो. सलीम भीम गीतं, समूहगीत आणि चित्रपटाची गाणी बासरीवर वाजवत असल्यामुळे दादरच्या स्टेशनवरुन जाणाऱ्या सर्वच वयोगटातील लोकांना सलीम हवाहवासा वाटतो. कारण आपण जी गाणी गुणगुणत असतो तीच गाणी सलीमच्या बासरीतून बाहेर पडत असतात. त्यामुळे अनेकांची पावलं सलीमजवळ थांबतात आणि आपल्या खिशात असणाऱ्या पाकिटाकडे हात जाऊन सलीमच्या खिशात पाच दहा रुपयाची भेट देऊन जातात.दिवसभर समूहगीत, चित्रपटांची गाणी, घरी जाताना 'सारे जहाँ से...'; सलीम शेखच्या बासरीचे मुंबईकर चाहते
रणजित माजगांवकर, एबीपी माझा, मुंबई | 18 Jan 2020 12:39 PM (IST)
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, की आपण नशिबाला दोष देत बसतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. पण सलीम शेखचं जीवन तर जन्मापासूनच अंधारमय. अशा परिस्थितीतही सलीमने न घाबरता या अंधाराशी सामना करायला सुरुवात केली.
