मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं मोठं विधान राऊतांनी केलंय. तरी, या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीतील सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही कायम सावरकर विरोधी राहिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेते काय भूमिका सांगतात हे पाहणं महत्वाचं आहे.


काय म्हणाले राऊत -
पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. मात्र, त्यांना सावरकरांचे कार्य माहिती आहे. मात्र, भारतरत्न देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत नाही, तर केंद्र सरकार आणि गृहमंत्रालय घेतं. सावरकरांनी आयुष्याची 14 वर्ष अंदमानच्या काळकोठडीत घालवली आहे. त्यांच्या याच कार्याचा सन्मान व्हावा यासाठी त्यांना भारतरत्न देण्याची भूमिका शिवसेना पहिल्यापासून घेत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनाही सावरकरांच्या कार्याची माहिती आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना, मग तो कोणत्याही पक्ष अथवा विचारधारेचा असुदेत त्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसची भूमिका -
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 'माझा'ला प्रतिक्रिया दिली. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत. मात्र, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावा ही शिवसेनेची भूमिका आहे. त्याचा राज्यसरकारशी काहीच संबंध नाही. सावरकरांबद्दलची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. सावकरांच्या विचाराने या देशाला विभाजित केल्याचा इतिहास देशाला माहिती असल्याचं अतुल लोंढे म्हणाले. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत केवळ धमक्या दिल्या आहेत. त्यामुळं त्यांचं वक्तव्य आम्ही गांभिर्याने घेत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांचं ते विधान काँग्रेसला इशारा - सोमय्या
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचं ते विधान काँग्रेसला इशारा आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. राऊतांनी त्यांच्या वक्तव्यातून राहुल गांधी यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा केल्याचा अर्थ सोमय्या यांनी काढला आहे.

भावाला मंत्री केलं नाही म्हणून बिथरले म्हणून राऊत बिथरले - तावडे
संजय राऊत हे भावाला मंत्री केलं नाही म्हणून बिथरले आहेत असं वाटतं. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसच्या सेवा दलने पुस्तक छापलं त्यावर मात्र एवढी जोरात प्रतिक्रिया दिलेली नाही. जर संजय राऊत यांनी सावरकर विरोधात वक्तव्य करणाऱ्या लोकांना खरंच अंदमानला पाठवायचे असेल तर राहुल गांधी यांना सर्वात पहिला नंबर लागतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. संजय राऊत यांचं वक्तव्य बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना मान्य आहे का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राऊत हे साधारण शरद पवार जे सांगतील तेच बोलत असल्याचा आरोपही तावडे यांनी केला आहे.

माझा विशेष | संजय राऊत हटाव कुजबुज आणि कुरबुर | ABP Majha