मुंबई  : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड  रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. 


यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वाढत्या कोविड  संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या आगग्रस्त रुग्णालयास देखील  तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व  इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यानी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच इतर कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले.


ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती


ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती अशी माहिती हाती आली आहे. 6 मे 2020 रोजी सनराईज हॉस्पिटलला कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कोविड हॉस्पिटल म्हणून तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. 31 मार्च 2021 पर्यंत तात्पुरत्या परवानगीचा कालावधी संपणार होता. सनराईज हॉस्पिटल प्रशासनाची आग प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. कुणाचा निष्काळजीपणा भोवला याचीही चौकशी होणार आहे. मार्च महिन्यात या हॉस्पिटलमधील अनियमितता आणि इतर त्रुटींकरता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या रुग्णालयात 78  पेशंट होते. त्यांपैकी 6 पेशंटचा मृत्यू झाला आहे तर 72 रुग्णांना आपण इतरत्र हलवलंय, अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे.   


ड्रीम मॉल शापित प्रॉपर्टी, घोटाळ्याचा महाल! 
हा मॉल शापित मॉल असल्याचे देखील बोलले जात आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता.  यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं.  यात भांडुप येथील या ड्रीम मॉलचा समावेश होता.  पालिकेने या मॉलला सुद्धा नोटीस बजावली होती, अशी माहिती आहे.  


Bhandup Fire | भांडुपमध्ये मॉलला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू


मॉल शापित प्रॉपर्टी 
दरम्यान हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. निर्माण झाल्यापासून तो कधीच सुरू झाला नाही. एचडीआयएल ने तो बांधला आहे. आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे.


हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल  
भाजप नेते कीरीट सोमय्या यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल आहे. Hdil ने हा मॉल बांधला. या हॉस्पिटलला ओसी नाही, अग्निशामक यंत्रणा नाही. आज इथे मृतकांची संख्या 2 आकडी होऊ शकते. यासाठी या मॉलच्या मालकाला जबाबदार धरलं पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.