मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य गेल्या सहा तासांपासून सुरु आहे.
ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहोचली. रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजूनही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचावकार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केलं.
सनराईज रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाहीत. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोव्हिड उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या औपचारिकतेचे काम बाकी होते ,त्यामुळे शव रुग्णालयात होते. आग लागली तेंव्हा आलर्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढले. 76 च्या आसपास रुग्ण आतमध्ये होते, त्यात दोन जणांचा आधीच मृत्यू झला होता. आता त्यांना जवळच्या मुलुंड जम्बो कोव्हिड सेंटर आणि फॉरटीस रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
या मॉलच्या टॉप फ्लोअरवर असलेले हे हॉस्पिटल गेल्या वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत निर्माण करण्यात आले होते असं सनराईज हॉस्पिटलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या काळात या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, आगीचे आणि इतर सर्व नियमांचे पालन करून हे हॉस्पिटल सुरु असून आताच्या आगीमध्ये स्टाफने बचावकार्यात मोलाचं योगदान दिलं असल्याचंही हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :