मुंबई : मुंबईमध्ये बेस्टचं किमान भाडं आता फक्त पाच रुपये असणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. बेस्टच्या भाडे कपातीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. सध्या बेस्टचे किमान भाडं आठ रुपये आहे. मात्र उद्यापासून प्रवाशांना किमान पाच रुपये भाडे देऊन प्रवास करता येणार आहे.


या संदर्भातील अधिसूचना आज राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत जारी करण्यात आली. बेस्टने दिलेल्या प्रस्तावानुसार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली. त्यानुसार आज ही अधिसूचना जारी करण्यात आली.


त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास उद्यापासून स्वत होणार आहे. बेस्टसाठी आता किमान प्रवास भाडे पाच रुपये असेल, तर इतर टप्प्यांच्या प्रवास भाड्यातही कपात होणार आहे, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.


उद्यापासून बेस्टचे कमी करण्यात आलेले नवे दर


बस भाडे (बिगर वातानुकूलित)


5 किलोमीटर 5 रुपये
10 किलोमीटर 10 रुपये
15 किलोमीटर 15 रुपये
15 पेक्षा अधिक किलोमीटर 20 रुपये


बस भाडे  (वातानुकूलित)


5 किलोमीटर 6 रुपये
10 किलोमीटर 13 रुपये
15 किलोमीटर 19 रुपये
15 पेक्षा अधिक किलोमीटर 25 रुपये