मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्याच बजेटनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात आज (सोमवार) दुपारपर्यंत तब्बल 792 अंकांची घसरण झाल्याचं चित्र आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.


आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार 792.82 अंकांच्या घसरणीनंतर 38,720.57 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजावेळी सेन्सेक्स तब्बल 907 अंकांनी घसरुन 38,6025.48 अंकांवर आला होता. मात्र दुपारनंतर सेन्सेक्स काहीसा सावरलेला दिसला. तर निफ्टीही 252.55 अंकांनी घसरुन 11,558.60 वर बंद झाला.

केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा गुंतवणूकदारांना समाधानकारक न वाटल्याने शेअर बाजारात घसरण झाल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना लिस्टेड कंपन्यांच्या पब्लिक शेअर होल्डिंगमध्ये वाढ करत तो 25 टक्क्यांवरुन 35 टक्क्यांवर नेण्याचं सेबीला सांगितलं होतं. तसंच 2 ते 5 कोटी आणि 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यावरही सरचार्ज वाढवण्याची घोषणा केली होती. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार सरचार्ज वाढल्याने शेअर बाजारातून पैसे कमावण्यावर लागणाऱ्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सवर परिणाम होणार आहे.

सेन्सेक्स अर्थसंकल्पाच्या दिवशीही 394.67 अंकानी घसरल्यानंतर बंद झाला होता. शेअर बाजारात शुक्रवार आणि सोमवारच्या घसरगुंडीनंतर तब्बल 5 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप यानंतर 148.08 कोटी राहिलं, जे गुरुवारी 153.58 कोटी रुपये होतं.