मुंबई: तोट्यात असणाऱ्या बेस्टने नवा प्रताप केला आहे. बेस्टने चार्जिंगवर धावणाऱ्या नव्या 6 बस खरेदी केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे एका बसची किंमत ही तब्बल 1 कोटी 63 लाख इतकी आहे.


नाही म्हणायला या बसचा फायदा म्हणजे यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आळा बसेल. पण एका बसची किंमत ही दीड कोटींपेक्षा जास्त असल्याने, 6 बसचा खर्च 10 कोटींच्या घरात गेला आहे.

बेस्टची आर्थिक परिस्थिती तोट्यात असूनही बसेसवर हा खर्च केल्याने प्रसासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या बसची किंमत सर्वसाधारण बेस्ट बसच्या किमतीपेक्षा तीन पटींनी जास्त. बेस्टच्या साध्या बसची किंमत 50 लाख तर एसी बसची किंमत 1 कोटी एवढी असते. 

सध्या 6 पैकी 4 तयार बस या बॅक बे आगारात निरीक्षणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन बसचे काम सुरु आहे.

या इलेक्ट्रीक बस प्रायोगिक तत्वावर दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांवर लवकरच धावताना दिसतील.

बॅक बे आगारातल्या एकमेव चार्जिंग पॉईंटवर ही बस 2-3 तासांत संपूर्ण चार्ज होऊ शकेल.

शंभर टक्के चार्ज असणारी ही बस साधारण 200 किमीचा प्रवास करु शकेल. मुंबईच्या रस्त्यांवरची वाहतूक कोंडी लक्षात घेता जास्तीत जास्त 6 ते 7 तास ही बस धावू शकेल.

मात्र जर ही बस रस्त्यात बंद पडली, किंवा चार्जिंग संपलं  तर बॅक बे आगारापर्यंत धक्का मारल्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही.

एकीकडे बेस्ट कर्मचा-यांचे पगार, बोनस देण्यासाठी पैसे नसताना, एसी बस बंद करुन बेस्ट प्रशासनानं त्यापेक्षाही महागड्या इलेक्ट्रीक बस आणल्या आहेत.