मुंबई : कुर्ला बेस्ट अपघात घटनेनंतर (Kurla Best Bus Accident) देखील बेस्ट प्रशासनाला जाग आली नसल्याचं चित्र समोर आलं आहे. बेस्ट बस चालक ड्युटीवर असताना दारू पिऊन गाडी चालवत असल्याच्या एकामागून एक घटना समोर येत आहेत. बेस्ट बस चालकाकडून बस थांबवून वाईन शॉप वर दारू घेताना आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता मुंबईकर सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न पडतोय.
याआधी अंधेरी पश्चिम ओशिवरामध्ये एक बेस्ट बस चालक बस थांबवून वाईन शॉप वरून दारू घेताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्याच पद्धतीने आणखी एक बेस्ट बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या बेस्ट चालकाला एका नागरिकाने जाब विचारल्यानंतर तो काहीही बोलू लागल्याचं दिसतंय. त्यातही तो दारू प्यायलेला दिसतोय. वरती मेडिकल करा, घाबरत नाही असंही तो म्हणताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओ मुळे बेस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेसमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे बेस्ट प्रशासनाचा त्यांच्या बस चालकांवर नियंत्रण आहे का असा प्रश्न मुंबईकर विचारात आहेत.सोबत या बस चालकावर बेस्ट प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी देखील बस प्रवाशांकडून केली जात आहे.
कुर्ला अपघाताला जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन?
मुंबईत कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. यात 7 जणांचा मृत्यू झालाय तर 48 जण जखमी झालेत. या अपघाताला नेमक जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोपी बसचालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीनं बेस्टमध्येच काम करायचा. त्याला 10 दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीनं बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवर ड्रायव्हर म्हणून घेण्यात आलं. पण त्यासाठी त्याला केवळ तीन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे बेस्टमध्ये कंत्राटी भरती सुरू झाल्याचा आरोप भाजपनं केला.
दरम्यान, कुर्ला अपघाताची चौकशी करण्यासाठी महापालिकेने एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
ही बातमी वाचा: