BEST Bus Workers Strike: बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या वेट लिज बसच्या (BEST Wet Lease Bus Workers) कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. बेस्टच्या सांताक्रूझ आगारात शनिवारी काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज जोगेश्वरीतील मजास आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. समान काम-समान दाम, बोनस व इतर मुद्यांवर हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना अपुऱ्या बस सेवेमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. 


आज सकाळपासून जोगेश्वरी येथील मजास बस आगारातील कंत्राटी शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. पगार, बोनस आणि समान काम समान मोबदला आदी मागण्या या आगारामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रदेखील दिले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे. या आंदोलनाची धग इतर आगारातही पोहचण्याची शक्यता आहे.  प्रतीक्षा नगर आणि धारावी आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. रविवारी सुट्टी असली तरी दिवाळी सणासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. मातेश्वरी अर्बन सोल्युशन प्रा. लिमिटेड या कंत्राटदारांने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. सांताक्रूझमधील आंदोलनात या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. 


मागील काही महिन्यांपासून बेस्ट प्रशासनाने नियुक्त केलेल्या वेट लिज बसच्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. सातत्याने होणाऱ्या आंदोलनामुळे बेस्टची बस वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी बेस्ट प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. 


दरम्यान, शनिवारी सकाळी सांताक्रूझमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारले. दुपारनंतरही कामगार आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर परिस्थितीती आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 


वेट लिज म्हणजे काय?


आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. यामध्ये बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. मुंबईत तीन कंत्राटदारांकडून बस सेवा पुरवली जाते. त्यातील एका कंत्राटदाराने आपली सेवा थांबवली आहे. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते.