विमान प्रवाशांची हवाई सुरक्षा वाऱ्यावर सोडू नका : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 16 Mar 2018 11:17 PM (IST)
‘विमान प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडू नका.’ अशा शब्दांत सदोष एअरक्राफ्ट इंजिनच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयानं डीजीसीएला सुनावलं आहे.
मुंबई : ‘विमान प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडू नका.’ अशा शब्दांत सदोष एअरक्राफ्ट इंजिनच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयानं डीजीसीएला सुनावलं आहे. विमानातून मुखत्वे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, व्यावसायिक, वकील आशी मंडळी प्रवास करतात त्यामुळे त्यांच्या जीवाची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचंही हायकोर्टानं यावेळी नमूद केलं. भारतात देशांतर्गत हवाई वाहतुक करणाऱ्या इंडिगो आणि गो एअरच्या ए-३२० या विमानांतील ४५० सीरीजच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक तुटी असल्याची बाब समोर आली आहे. या इंजिनची निर्मिती करणाऱ्या बी अँड डब्ल्यू कंपनीनंच ही गोष्ट कबूल केली आहे. त्यामुळे इंडिगोची ९ आणि गो एअरची ५ अशी एकूण १४ विमानं तात्काळ सेवेतून बाद ठरवावीत अशी मागणी करत हरिष अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावर स्पष्टीकरण देताना डीजीसीएनं स्पष्ट केलं की, त्यांनाही या गोष्टीची कल्पना आहे. त्यांनीही या संदर्भात देशभरातील विमानांची तपासणी केली आहे. डीजीसीएच्या दाव्यानुसार दोन इंजिन असलेल्या विमानांतील केवळ एक इंजिन या ४५० सीरीजचं असेल त्यांनाचं उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. कारण त्या विमानातील दुसरं इंजिन हे पूर्णरणे निर्दोष आहे. मात्र तरीही एक बेभरवश्याचं इंजिन चालवण्याची परवानगी देऊन विमान प्रवाश्यांची सुरक्षा धोक्यात घालणं योग्य नाही. असं मत व्यक्त करत हायकोर्टानं डीजीसीएला यासंदर्भात केलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेऊन आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये युरोपियन एअर सेफ्टी अथॉरीटीनं पीडब्ल्यू ११०० इंजिनच्या काही ठराविक सीरीजमध्ये तांत्रिक दोष असल्याचा अहवाल सादर केला आहे. या दोषामुळे खासकरून खाऱ्या हवेत इंजिनमध्ये बिघाड निर्माण होऊन इंजिन फेल्युअरचा धोका निर्माण होऊ शकतो. असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही इंजिन बसवलेली विमानं मुंबई, चेन्नई, कोलकाता अशा समुद्राजवळील भागात उडवू नयेत. अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.