मुंबई : गुटख्यात नशा येण्यासाठी पालीची शेपटी टाकली जाते असा सनसनाटी आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे. ते विधानपरिषदेत बोलत होते. तसंच झोपडपट्ट्यांमध्ये गुटखा तयार करणाऱ्या लोकांचे गँगस्टरशी संबध असल्यानं तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नाहीत असा दावाही त्यांनी केला आहे.


नेमकं काय म्हणाले अनिल परब?

‘गुटखा ज्या झोपडपट्यांमध्ये अवैधपणे तयार होतो. यावर सभागृहात जी चर्चा सुरु होती त्यावर मी असं म्हणालो की, मंत्री महोदयांना माहित नसेल तर मी त्यांना घेऊन जातो. मी ज्या विभागात राहतो. तिथं अशी अनेक ठिकाणं आहेत. जिथे गुटखा तयार केला जातो, तंबाखूवर वेगवेगळी केमिकल वापरुन त्याच्यामध्ये नशा येण्यासाठी पालीची शेपटीही वापरली जाते. हे प्रकार मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे हे एक मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी आता जो कायदा आहे तो फार तकलादू आहे. म्हणून या कायद्यात सुधारणा करुन हा गुन्हा अजामिनपात्र करावा. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी. लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे.’ असं अनिल परब यावेळी म्हणाले.

दरम्यान, गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची तयारी अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दर्शवली आहे.

VIDEO :